ब्रिटिश कंपनी सुरु करणार उत्तर प्रदेशात शस्त्र निर्मिती कारखाना

September 24,2020

लखनौ : २४ सप्टेंबर - ब्रिटनस्थित वेब्ले अॅाण्ड स्कॉट ही शस्त्रनिर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी आगामी नोव्हेंबरपासून शस्त्र निर्मिती करणार आहे. लखनौपासून सुमारे 30 कि.मी. अंतरावरील सॅण्डिला (हरदोई) येथे या कंपनीने कारखाना उभारला असून देशात शस्त्रनिर्मिती करणारी ही पहिलीच विदेशी कंपनी असेल.

हॅण्डगनची निर्मिती करणार्या या दिग्गज कंपनीने या प्रकल्पासाठी लखनौस्थित सियाल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडशी करार केला आहे. रिव्हॉल्व्हर्सच्या निर्मितीपासून या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 0.32 रिव्हॉल्व्हर्सची निर्मिती करणार आहे. 0.32 रिव्हॉल्व्हर्सच्या निर्मितीनंतर आम्ही पिस्टल, एअरगन, शॉटगन तसेच दारुगोळ्याचीसुद्धा निर्मिती करणार आहोत, असे वेब्ले अॅचण्ड स्कॉट कंपनीचे सहमालक जॉन ब्राईट यांनी बर्मिंगम येथून दूरध्वनीवर बोलताना सांगितले.

 भरपूर बाजारक्षमता असल्याचे लक्षात घेऊन आम्ही भारतात तसेच उत्तर प्रदेश राज्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 2018 साली आम्ही सियाल कंपनीशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आम्ही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना आखली. भारतीय देशांतर्गत बाजारपेठेसाठी शस्त्रनिर्मितीच्या संयुक्त उपक्रमात प्रवेश केला, असे त्यांनी सांगितले.