पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये सापडले नक्षलवाद्यांचे साहित्य

September 24,2020

गोंदिया : २४ सप्टेंबर - गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चीचगड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोसबी जंगल शिवारात सी - ६0 कमांडो पथकाने नक्षलविरोधी अभियान अंतर्गत सर्च ऑपरेशन मोहीम राबवली. या दरम्यान नक्षल्यांच्या वापरातील साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय असल्याची बाब समोर आली आहे.

जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेताच नक्षल्यांचा बिमोड करण्याच्या उद्येशाने नक्षल शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले. यावरून २२ सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अतुल तावाडे, सपोनि. कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वात सी- ६0 पथकाच्या जवानांनी कोसबी जंगल शिवारात सर्च ऑपरेशन राबविले. या दरम्यान नक्षल्यांकडून दैनंदिन वापरल्या जाणार्या वस्तू शोधण्यास पथकाला यश आले आहे. या साठवून ठेवलेल्या साहित्याची तपासणी केली असता त्या ठिकाणी पाच काळ्या रंगाच्या ताडपत्र्या मिळून आल्या. सदर ताडपत्र्यांचा उपयोग नक्षलवादी जंगलात राहण्याकरिता करत असल्याचे समजून आले. परिसरात शोध मोहिम राबविली जात आहे.