सुरतच्या गॅस प्रकल्पात भीषण आग

September 24,2020

सूरत : २४ सप्टेंबर - गुजरातच्या सूरत येथे असलेल्या ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आहे आहे. ही आग इतकी भीषण होती की अद्यापही स्फोटांचे आवाज येत आहेत. त्यामुंळे जवळपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. गॅस पाईपलाईनच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ओएनजीसी गॅस प्रकल्पातील स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाच्या वेळी घराचे दारे खिडक्या भूकंप झाल्यासारखे हादरत होत्या, असे आजूबाजूच्या गावातील लोकांनी सांगितले. सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी सांगितले की, ओएनजीसी गॅस प्रकल्पामध्ये लागलेली आग ही सध्या ऑन साईट इमरजेंसी अशा स्थितीत आहे. ऑफ साइट इमरजेंसी नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ही आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे त्यांनी सांगितले.