सशस्त्र दरोडा घालणाऱ्या एका आरोपीस अटक, ५ लाख ७० हजाराचा माल जप्त

September 20,2020

अकोला : २० सप्टेंबर - तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर येथे २० सप्टेंबरच्या रात्री सव्वा वाजताच्या सुमारास ताराचंद नारायणदास बजाज यांच्या घरी दोन अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. याघटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना रात्री अडीचच्या सुमारास मिळतात पोलिस प्रशासन सतर्क झाले.

 तालुक्यातील ग्राम वाडी आदमपूर येथे गावठी कट्टा सह सशस्त्र दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी थेट वाडी आदमपूर गाठले व गतीने तपासाची चक्रे फिरविली. संपूर्ण जिल्ह्यात नाका-बंदी करण्यात आली यासह पोलिस अधीक्षक जी श्रीधर व आकोट उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट विभागातील सर्व ठाणे प्रभारी यांच्या मदतीने वाडी आदमपूर येथून पळालेल्या संशयित इसमाचा पाठलाग केला. अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि फड तेल्हारा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश देशमुख तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी राजू इंगळे राजेश्वर सोनवणे गजानन राठोड अविनाश डाबेराव यांनी पाठलाग केला.

 पोस्टे दहीहंडा हद्दीतील ग्राम पळसोद येथे सदर संशयिताला पकडण्यात आले त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव असलम उर्फ अहमद शहा यासीन शहा 21 वर्ष तसेच मुस्कान बी असलम शहा वय 20 वर्ष दोन्ही इंदिरा नगर तेल्हारा ह मु भिम नगर शिवनी अकोला असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपीचा जवळून एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस तसेच आरोपीचे शिवणी येथील घरातून पाच लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल व एक हजार रुपये नगदी आणि पन्नास हजार रुपयाची पल्सर मोटरसायकल असा एकूण पाच लाख 70 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध ताराचंद नारायणदास बजाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तेल्हारा पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा भौतिक पुरावा मिळवण्यासाठी फिंगरप्रिंट फॉरेन्सिकची चमू तसेच पोलिस श्वानपथकाची मदत घेण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश देशमुख करीत आहेत.