दारू विक्रेत्यांनी केला पत्रकारावर हल्ला

September 20,2020

चंद्रपूर : २० सप्टेंबर - चंद्रपूर शहरातील एका वृत्तपत्राचे संपादक रोहीत तुराणकर यांच्यावर इंदिरानगर-शामनगर परिसरातील अवैध दारू विक्री व दादागिरी करणार्या पिंटू, सतिश व प्रदीप वाढई यांनी तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात रोहीतची आईसुद्धा जखमी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पिंटू वाढई यांना अटक केली असून तो आर्मीमध्ये नोकरीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आरोपींविरूद्ध भादवि कलम ३२४ अंतर्गत रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हाके यांनी सांगितले. शहरातील इंदिरानगर-शामनगर परिसरात पिंटू, सतिश व प्रदिप वाढई यांचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांचा दारूसाठा पोलिसांकरवी पकडण्यात आला होता. त्याचाच वचपा काढण्याच्या दृष्टीने शुक्रवारी ( दि. १८) एका वृत्तपत्राचे संपादक रोहीत तुराणकर यांच्यावर शामनगर येथील पिंटू, सतिश व प्रदीप वाढई या अवैध दारू विक्री करणार्यांनी चक्क तलवारीने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात रोहित तुराणकर यांच्या आईसुद्धा जखमी झाल्या. वेळेवर परिसरात नागरिक मदतीला धावून आल्याने रोहीत तुराणकर यांचा जीव वाचला. आरोपींविरुद्ध यापूर्वी ही दारू विक्री व अन्य प्रकारचे अपराधिक गुन्हे आहे. ज्या परिसरात हे दारू व्यावसायिक दारूचा व्यवसाय करतात, त्या ठिकाणी त्यांची दहशत असल्यामुळे कोणीही समोर येण्यास धजावत नाही. 

आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, या आशयाचे आज रामनगर पोलिस ठाणेदार हाके यांना पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. विशेष बाब म्हणजे पत्रकार रोहीत तुराणकर हे कोरोना काळामध्ये पोलिसांचे सहकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी या काळामध्ये नि:शुल्कपणे पोलिसांना सहकार्य केले व त्यांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.