उधारीच्या पैशावरून केला युवकाचा खून

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - न मिळालेल्या  पैशांच्या वाटणीवरून झालेल्या भांडणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचा खून झाल्याची विचित्र घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. यश मधुकर ठाकरे (१९) रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी असे मृताचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ४ ने खुनाच्या घटनेचा ६ तासांत छडा लावला. यशोधरानगर हद्दीतील माजरी गावात उधार दारू पिणार्या युवकाचा उधारीच्या पैशावरून झालेल्या भांडणात दारू विक्रेत्याने खून केल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास यश ठाकरे या युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राऊतनगरजवळ झुडुपात सापडला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी गेले. तेव्हा मृतदेह पाहताच तो हिस्ट्रीशिटर यशचा असल्याचे त्यांना कळले. यशविरुद्ध काही महिन्यांपूर्वी लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले होते. मे महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याने तो क्वॉरन्टाईन होता. बरा झाल्यानंतर तो एका पेट्रोलपंपावर काम करायला लागला होता. पण, त्याची संगत मात्र गुन्हेगारांसोबतच होती. यशची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्या संगतीतील मित्राची माहिती पोलिसांनी गोळा करणे सुरू केले. याचवेळी क्राईम ब्रांच युनिट क्रमांक ४ च्या सहायक पोलिस निरीक्षक बट्टूलाल पांडे यांना या हत्याकांडातील दोन आरोपी मोमीनपुरा येथील बकरामंडी येथे लपून बसल्याची आणि पहाटेच्या सुमारास नागपुरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. वाठोडा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम  यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांनी यशची हत्या केल्याचे कबूल केले. 

मृतक यश ठाकरे, आरोपी इम्तियाज अली (२१) रा. मोठा ताजबाग आणि शेख आसीम (२४) रा. गौसीया कॉलनी, हे तिघे मित्र होते. तिघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तिघांना दारू आणि गांजा सेवन करण्याची सवय होती. गेल्या काही दिवसांपासून यशला त्याच्या मोबाईलवर 'कौन बनेगा करोडपती' मध्ये सहभागी होण्यासाठी मॅसेज येत होते. हे मॅसेज तो इम्तियाज अली आणि शेख आसीम यांना दाखवायचा. तिघेही सोबतच कोणतेही कांड करायचे, त्यामुळे कौन बनेगा करोडपती येथे मिळणार्या पैशांचीही समान वाटणी व्हावी, असा तगादा इम्तियाज आणि शेख आसीम यांनी यशला लावला होता. पण, यशने त्यांना साफ नकार दिला. त्यामुळे इम्तियाज आली आणि शेख आसीम यशवर चांगलेच चिडले होते. शुक्रवारी सायंकाळी यश , इम्तियाज आणि शेख आसीम सेनापतीनगरातील खुल्या मैदानावर गेले. त्यांच्यात पुन्हा पैशावरून वाद सुरू झाला. वाद वाढल्याने यशने त्यांना मारण्यासाठी जवळचा चाकू काढला. इम्तियाज आणि शेख आसीमने मिळून त्याला पकडले आणि त्याच्याच चाकूने त्याच्यावर वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यांनतर दोघेही पळून मोमीनपुरा येथील बकरा मंडीत लपून बसले.