अज्ञात व्यक्तीने श्वानाचे डोळे फोडले, नागरिकांमध्ये संताप

September 15,2020

नागपूर: १५ सप्टेंबर - अज्ञात व्यक्तीने एका मादी श्वानावर हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अमरावती मार्गावर बोले पेट्रोल पंपाजवळ एक मादी श्वान रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे लोकांना दिसले. याबाबत कळताच पशुप्रेमी अभिषेक तुरक, समीर उके, प्रतीक अरोरा, साहील हे घटनास्थळी पोहचले. या श्वानाच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त वाहात होते. हे पशुप्रेमी श्वानाला घेऊन डॉ. गौरी कानटे यांच्या पशू दवाखान्यात गेले. तेथे शस्त्रक्रिया करून श्वानाचे दोन्ही डोळे काढावे लागले. त्यामुळे अंध झालेल्या या श्वानाची जबाबदारी आता राइस टू टेल्स य संस्थेने घेतली आहे. ही संस्था या श्वानाची देखभाल करणार आहे. या घटनेनंतर पशुकल्याण अधिकारी अंजली वैद्यार, ईश्वर पोतदार, निकिता बोबडे, प्रतीक अरोरा, कल्याणी व अन्य पशुप्रेमी सीताबर्डी पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.