“भगवे कपडे घालून काही लोकांची नौटंकी सुरु आहे, पण जनता..”, नाना पटोले यांची टीका

February 12,2024

खऱ्या साधू-संतांना भाजपाचा राग आहे. तसंच देशात भगवे कपडे घालून नौटंकी सुरु आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. चारही शंकराचार्यांनी भाजपाची कृत्यांचा निषेध केला. प्रभू राम हे जणू काही देशाबाहेर गेले आहेत आणि यांचे विश्वगुरू हे रामाला हाताला धरुन अयोध्येत आणत आहेत अशी पोस्टर्स लावली गेली. धर्मगुरुंना हे मुळीच पटलेलं नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

धर्माविरोधातले पाखंडी लोकच भाजपाला मान्यता देतात

धर्माविरोधातले पाखंडी लोकच यांना मान्यता देतील. चार शंकराचार्यांनी या सरकारच्या कारभाराला नापास केलं आहे. जे खरे साधू संत आहेत त्यांना भाजपाचा राग आहे. त्याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सध्या देशात भगवे कपडे घालून काही लोकांची नौटंकी सुरु आहे. १५ लाख रुपये आणून देणारे कुठे गेले? भगवे कपडे घातलेल्या काहींनी बोललं म्हणजे हिंदू धर्माने बोललं असं कुणालाही वाटायची गरज नाही असंही नाना पटोले म्हणाले.

देशावर २ लाख ५ हजार कोटींचं कर्ज मोदी सरकारने करुन ठेवलं आहे

सध्या आपल्या देशावर २ लाख ५ हजार कोटींचं कर्ज मोदी सरकारने करुन ठेवलं आहे. त्यावर उत्तर दिलं पाहिजे. तसंच जीएसटीच्या माध्यमातून जो पैसा गोळा केला आहे तो कुठे आहे? याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे. आज त्यांनी कितीही डिंगडाँग केलं तरीही काही फरक पडणार नाही. आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहोत. लोकांना भाजपा काय आहे ते कळलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा या आम्हालाच मिळतील असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु आहे

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मांत भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मागच्या दोन महिन्यांतल्या घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या आहेत. राज्यपाल महोदयांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे अशीही माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.