राममंदिर भूमिपूजन पार्श्वभूमीवर काढली जातेय बाळासाहेब ठाकरेंची आठवण

August 05,2020

नवी दिल्ली : ५ ऑगस्ट - अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आज काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी शेअर करत असताना ट्विटरवर देखील बाळासाहेब ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचं सांगत नेटकरी त्यांचे आभार मानत आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला.  ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात एक ट्विट केलं आहे.

संजय राऊत यांनी कोणताही कॅप्शन न देता सकाळी दहा वाजता एक फोटो ट्विटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील मजकूर आहे. फोटोमध्ये भगवा झेंडा असणारा राम मंदिराचा घुमट दिसत आहे. भगव्या रंगाच्या या पोस्टकार्डमध्ये श्री असं अक्षर लिहिण्यात आलं आहे. मात्र श्रीवरील वेलांटीऐवजी तिथे शिवसेनेचे चिन्ह असणारं धनुष्यबाण दाखवण्यात आला आहे. श्री या अक्षराच्या बाजूला, “बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असं लिहिण्यात आलं आहे. फोटोच्या तळाशी, “गर्व से कहो हम हिंदू है” असं वाक्य आहे.

बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठलं होतं. मात्र या घटनेनंतर शिवसेना या पक्षाची हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा याच काळातला होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक अनोखं नातं होतं. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केलं जातं आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.