कुलभूषण जाधव प्रकरणी वकील नेमण्याचे पाकिस्तान उच्च न्यायालयाने दिले आदेश

August 05,2020

नवी दिल्ली : ५ ऑगस्ट - कथित हेरगिरी आणि पाकिस्तानमधील बॉम्बस्फोट प्रकरणी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात इस्लामाबाद हायकोर्टाने तीन वकिलांची नेमणूक केली आहे. या तिन्ही वकिलांना न्याय मित्र घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय, कोर्टाने भारत सरकार आणि कुलभूषण जाधव यांना पुन्हा एकदा बचावासाठी वकील  नियुक्त करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारला दिले आहेत.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. त्याशिवाय मुख्य न्यायाधीश अताहर मिनाल्लाह आणि न्या. मियानगुल हसन औरंगजेब यांनी या खटल्याशी संबंधित अनावश्यक वक्तव्यांना घेऊन इशारा दिला. जाधव यांच्याबाबत कोणतेही विधान करण्याआधी निष्पक्ष खटल्याला लक्षात घेतले पाहिजे,असेही कोर्टाने सरकारी वकिलांना बजावले.

इस्लामाबाद हायकोर्टाने आबिद मंटो, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे वरिष्ठ वकील मखदूम अली खान यांना कायदेशीर मदतीसाठी न्याय मित्र म्हणून नियुक्ती करत असल्याचे कोर्टाने म्हटले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी या न्याय मित्रांचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्याशिवाय, कुलभूषण जाधव यांच्यावरील दोष सिद्ध करणे, त्यांना मिळालेली शिक्षा अथवा त्यावरील पुनर्विचार करण्याबाबतच्या प्रक्रियेला निश्चित करण्यासाठी जाधव आणि भारत सरकारला योग्य वेळ देणे आवश्यक असल्याचेही कोर्टाने म्हटले. कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्यासाठी आणखी भारताला आणखी एक संधी देण्याचे आदेश कोर्टाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत. त्याआधी मागील महिन्यात कुलभूषण यांनी आपल्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. या दाव्यामुळे खळबळ माजली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी कुलभूषण जाधव यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला. त्याऐवजी सध्या दाखल केलेल्या दया याचिकाच पुढे पाठवण्यात यावी असंही या अधिकार्याने म्हटले होते.

अटर्नी जनरल खान यांनी सांगितले की, पाकिस्तान सरकार कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात निष्पक्ष खटल्यासाठी प्रतिबद्ध आहे. जाधव यांची काळजी घेतली जात असून त्यांचे आरोग्य उत्तम असल्याची त्यांनी माहिती दिली.