विशाखापट्टणममध्ये क्रेन कोसळल्याने १० मजूर ठार

August 01,2020

विशाखापट्टणम : १ ऑगस्ट - आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १० मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १ मजूर जखमी झाला आहे. 

क्रेनमधून लोडिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. क्रेन कोसळल्याने १० कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर जखमी झालेल्या मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. डीसीपी सुरेश बाबू क्रेन कोसळून दुर्घटना घडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळावरून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.