मनसेचे वर्ध्यात अनोखे आंदोलन

August 01,2020

वर्धा : १ ऑगस्ट - मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आज १ रोजी नंदोरी चौक येथे दूध दरवाढीकरीता महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने अनोखे आंदोलन केले. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी 'मनसे'च्या कार्यकर्त्यांनी चक्क म्हशीच या दूध आंदोलनात आणल्या आणि म्हशीच्या अंगावर 'राज्य सरकारचा निषेध लिहून दूध दरवाढीची मागणी सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

 शेतकरी अगोदरच सततच्या दुष्काळामुळे तसेच बोगस बियानांमुळे आलेल्या दुबार पेरणीच्या संकटाने परेशान आहे त्यातच कोरोनामुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतीला जोड म्हणून केला जाणारा दुग्धव्यवसायही कमी झालेल्या दूध दराच्या समस्यांमुळे अडचणीत आला आहे. यामुळे दूध उत्पादकांना या संकटांतून वाचवण्यासाठी सरकार ने दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे या व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भर रस्त्यावर उतरूनपुढेहि दूध आंदोलन करणार आहे.

शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधाला २७रु ५०पैसे तर म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असतानाही खासगी सहकारी व शासकीय दूध संघांनी दूध दरात १० ते १५ रुपयांची कपात करण्यात सुरुवात केली आहे. त्यातच पशुखाद्याचा दरात मोठी वाढ झाल्याने व दुधाचे पैसेसुद्धा महिना-महिना मिळत नसल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.