मेहबुबा मुफ्ती यांचा स्थानबद्धता कालावधी वाढवला

August 01,2020

नवी दिल्ली : १ऑगस्ट - लोकसुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कोठडीत आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला.

 गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी कलम 370 निष्प्रभ करण्यात आल्यानंतर मेहबुबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह शेकडो राजकीय नेते आणि फुटीरतावाद्यांना लोकसुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. यातील काहींची मुक्तता करण्यात आली, तर बरेच जण अजूनही कैदेत आहेत.

 मेहबुबा मुफ्ती यांचा कैदीतील कालावधी येत्या 5 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार होता, त्यात आता आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांना त्यांच्या निवासस्थानीच कैद करण्यात आले आहे. या निवासालाच उपकारागृहाचे स्वरूप देण्यात आले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन यांची सुमारे एक वर्षाच्या कैदेनंतर आज मुक्तता करण्यात आली. माझ्या कैदेला येत्या 5 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, त्याआधीच मी मुक्त झालो, असे टि्वट स्वत: लोन यांनीही केले.