महाकवी सुधाकर गायधनी यांना साहित्य विहार च्या वतीने ज्ञानयोगी पुरस्कार प्रदान

July 26,2021

नागपूर : २६ जुलै - साहित्य विहार संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'ज्ञानयोगी' पुरस्कार महाकवी सुधाकर गायधनी यांना प्रदान करण्यात आला. गायधनी यांनी आजवर केलेल्या साहित्यसाधनेला संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला.
साहित्य विहार संस्थेतर्फे वार्षिक ज्ञानयोगी सन्मान आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार प्रदान समारंभ घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. संजय दुधे अध्यक्षस्थानी होते. तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे , पुरस्काराच्या प्रायोजक डॉ. अर्चना अलोणी व संस्थेच्या अध्यक्ष ज्येष्ठ पंचभाषिक साहित्यिक आशा पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृतज्ञता हा साहित्य विहार संस्थेचा स्थायीभाव असल्याचे आशा पांडे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. संस्थेने आजवर साहित्य क्षेत्रात दर्जेदार साहित्य व साहित्यिक घडविण्यासाठी केलेल्या अथक पर्शिमाबद्दल माहिती दिली. महाकवी सुधाकर गायधनींच्या साहित्याचा आढावा घेताना डॉ. प्रज्ञा आपटे यांनी गायधनींचा 'देवदूत' हा काव्यसंग्रह महाकाव्याचे निकष पूर्ण करतो, असे भाष्य केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर गायधनी यांचे काव्य गाजतेय, याबद्दल साहित्य क्षेत्राला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. संजय दुधे यांनी लेखन-वाचन संस्कृती जगली तरच समाजाची संवेदनशीलता टिकेल, असे सांगत साहित्य विहार या संस्कृती रक्षणात महत्त्वाचा वाटा उचलत असल्याने संस्थेचे अभिनंदन केले. सत्काराला उत्तर देताना महाकवी सुधाकर गायधनी यांनी पुरस्कार देणार्या साहित्य विहारशी असलेले ऋणानुबंध  मी आजवर जपले असून आजचा हा क्षण माझ्या आयुष्याच्या जीवनग्रंथात कायम कोरलेला राहील, असे उद्गार काढले. या समारंभाच्या दुसर्या सत्रात डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यात कवितेसाठी विजय देशमुख (मुंबई), कादंबरी साठी दशरथ चौरे (अहमदनगर), कथा विभागासाठी डॉ. वसुधा पांडे (नागपूर), ललित साहित्यसाठी इंदुमती हस्ते, डॉ. वर्षा गंगणे (गोंदिया), अनुवाद साहित्य प्रकारासाठी विजया देशपांडे (औरंगाबाद), गझलसाठी संतोष कांबळे (नाशिक), एकांकिकासाठी प्रीती वडनेरकर (नागपूर), कुमार साहित्यासाठी रमेश तांबे (मुंबई), बालसाहित्यासाठी किरण भावसार (नाशिक) व हिंदी कवितेसाठी डॉ. राम मुळे (नागपूर)यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनंदनपर मार्गदर्शन करताना डॉ. चांदे यांनी ऊर्जा व ऊर्मीचे लेखन प्रतिभेशी असलेले नाते विशद केले. विजेत्यांतर्फे डॉ. विजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.