नागपुरात ७८ किलो गांजा पकडला, गुन्हे शाखा व बुटीबोरी पोलिसांची संयुक्त कारवाई

July 26,2021

नागपूर : २६ जुलै - आंध्रप्रदेशातून येणाऱ्या  ट्रकवर कारवाई करून नागपूर ग्रामीण गुन्हे शाखा व बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ७८ किलो गांजाची खेप पकडली. ही कारवाई महामार्ग क्रमांक ७ वर करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. भुरालाल चितरलाल मिणा (४0) रा. संजय गांधीनगर जि. कोटा राजस्थान, अखिलेश परामराम झरिया (२५) रा. बागासहाई जि. जबलपूर मध्यप्रदेश व चोथमल सत्यनारायण मिणा (२५) रा. भोवरा जि.बरान, राजस्थान यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून २८,२३,६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात गस्तीवर असताना आर.जे. ११ जीबी ४६३२ ट्रकमधून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरून अंमली पदार्थ गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शासकीय पंचासह राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ असलेला न्यू हायवे ढाबा रुईखैरीसमोर नाकाबंदी करून वाहनाची पाहणी करीत असताना ट्रक क्र. आर.जे. ११ जीबी ४६३२ हा नागपूरकडे येताना दिसला. या ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता ट्रकच्या टपावरील कॅबिनमध्ये ४ प्लॉस्टिक बोरी आढळून आल्या. त्यात गांजाची वाहतूक होत होती. याप्रकरणी ट्रकसह मुद्देमाल जप्त करून आरोपींनी अटक करण्यात आली.