घरगुती वीज ग्राहकांना मिळणार आता ‘स्मार्ट’ मीटर! प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात उपलब्ध

July 21,2021

मुंबई:२१ जुलै- घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगच्या तक्रारींवर राज्याच्या ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना ‘स्मार्ट’ मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई, उपनगरे, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.  स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नितीन राऊत यांनी याबाबत निर्देश दिले.

राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या. मोबाईल सिमच्या वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असेल. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत, त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल.

स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल, तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीज चोरीस आळा बसेल.