डोक्यात काठीने वार करून घेतला जन्मदात्या बापाचा जीव

May 03,2021

वर्धा : ३ मे - महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर याठिकाणी एका मुलानं आपल्या जन्मदात्या बापाला संपवलं आहे. घरगुती वाद विकोपाला गेल्यानं त्यानं एका भारी भक्कम काठीनं बापाच्या डोक्यात जबरी वार केला आहे. यामध्ये बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटना अल्लीपूरनजीकच्या पवनी गावात घडली असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित ५२ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव सुरेश गवळी असून त्यांना दारूचं व्यसन होतं. संबंधित कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. तर सुरेश हा स्वतः कमावलेले सर्व पैशे दारुच्या नशेसाठी खर्च करत असे. तसेच दारुसाठी पैशे कमी पडल्यास तो पत्नी आणि मुलाचा छळ करायचा. त्यामुळे गवळी कुटुंबात सातत्यानं खटके उडायचे. दरम्यान मृत सुरेश यांचा अपघात झाल्यानं ते घरीच पडून होते. त्यामुळे संसाराचा सर्व भार सुरेशच्या पत्नीच्या खांद्यावर येऊन पडला होता. सुरेशची पत्नी मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवत होती.
अशा स्थितीतही सुरेशचं दारुचं व्यसन सुटत नव्हतं. यावरून रविवारी दुपारी सुरेश आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्यात वाद झाला. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादातून संतापलेल्या आदित्यनं टोकाचं पाऊल उचललं. त्यानं जवळचं पडलेल्या काठीनं सुरेश यांच्या डोक्यात जबरी वार केला. हा वार इतका भयानक होता की, सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.