ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू

May 03,2021

बंगळुरू : ३ मे - ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दररोज ओरडत होत असून, देशात कुठे न् कुठे रुग्णांना प्राणास मुकावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. आंध्र प्रदेशातही दिरंगाईमुळे मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने  कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये करोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे.
कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. मात्र, ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात करोनाबाधित रुग्णही आहेत.
चमराजनगर रुग्णालयात जे काही झालं ते दुर्दैवी आहे. या घटनेबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मी मैसूर, मंड्या आणि चमराजनगरला जात आहे. चमराजनगरमध्ये रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर रुग्णालयाला सामोऱ्या जाव्या लागत असलेल्या इतर समस्यांचीही माहिती घेऊ,” असं कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हटलं आहे.
‘करोना रुग्णांसह एकूण २४ उपचाराधीन रुग्णांचा ऑक्सिजन तुटवडा आणि इतर कारणांमुळे चमराजनगर जिल्हा रुग्णलायात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या मृत्यूच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत,’ असं जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी चमराजनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर या घटनेची दखल घेऊन उद्या मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.