कोणत्याही परिस्थिती शेतकरी आंदोलन थांबणार नाही - राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

April 07,2021

सहारनपूर : ७ एप्रिल - कोणत्याही परिस्थिती शेतकरी आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी बुधवारी केंद्र सरकारला दिलाय. करोनाच्या नावावर सरकारकडून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, आमचं आंदोलन असंच अविरत सुरू राहील, असंही त्यांनी म्हटलंय. राकेश टिकैत सहारनपूरमध्ये बोलत होते.

'करोनाच्या नावावर शेतकऱ्यांना घाबरवणं सरकारनं बंद करावं. शेतकरी आंदोलन म्हणजे काही शाहीनबाग नाही, जे कोविडच्या नावावर संपवता येईल. देशात कर्फ्यू लागलेला असेल किंवा लॉकडाऊन, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे', असं राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

शहीद भगत सिंह यांचे भाचे किरणजीत सिंह यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी राकेश टिकैत सहारनपूरमध्ये दाखल झाले होते. 

उत्तर प्रदेशातून राकेश टिकैत आज हिमाचल प्रदेशला जाणार आहे. इथे मोठ्या संख्येतील बागायतदार शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते बिहारला दाखल होती. इथे शेतकरी पंचायतीचं आयोजन करण्यात आलंय.

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात आपल्यावर जो हल्ला झाला तो भाजपच्याच गुंडांनी केल्याचा पुन्हा एकदा दावा राकेश टिकैत यांनी केला. परंतु, या प्रकरणात आपण कोणतीही कारवाई करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

आपल्या गुजरात दौऱ्यानंतर, गुजरातमधील शेतकरी बंधनात आहेत, त्यांच्या सुटकेसाठी शेतकरी मुक्ती मोहीम सुरू करावी लागेल, असंही राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं. गुजरातमध्ये पोलिसांची मनमानी सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.