नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा आरोप

April 07,2021

मुंबई : ७ एप्रिल -  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.

महत्वाची बाब म्हणजे सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझे यांच्या पत्रात करण्यात आलाय.

दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने CBIला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता CBI कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.