पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणीच्या बातम्या प्रसारित करण्यास उच्च न्यायालयाची मनाई

March 06,2021

पुणे, 6 मार्च : पुण्यातील तरुणीचे बहुचर्चित आत्महत्या प्रकरण व तिच्या कथित अनैेतिक संबंधांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना दिली.

तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधाबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीच्या एस.एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती. तरुणीच्या वडिलांच्यावतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पुण्याच्या घरातील बालक्नीत उभ्या असलेल्या तरुणीचा पाय घसरल्याने ती बालक्नीतून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यावर लगेचच प्रसारमाध्यमांनी 23 वर्षीय तरुणीचे एका राजकीय व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त बदनामीकारक आहे. तसेच तरुणाचे अज्ञात व्यक्तीबरोबर झालेले संभाषण राजकीय व्यक्तींनी व प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले, अशी माहिती गुप्ते यांनी उच्च न्यायालयाला दिली.

गुप्ते यांनी दिवंगत बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांनी कशाप्रकारे वार्तांकन करावे, याबाबत आखलेली मार्गदर्शक तत्त्वे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सकृतदृर्शनी याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे म्हणत न्यायालयाने सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश प्रसारमाध्यमांना दिले. तसेच याचिकर्त्यांच्या मुलीच्या मृत्यूसंबंधी व तिच्या कथित प्रेमसंबंधाला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असेही न्यायालयाने सांगितले.