चीनमध्ये सापडला आणखी एक नवा व्हायरस

January 17,2021

मुंबई, 17 जानेवारी :  कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली 2020 या वर्षातील बहुतेक काळ गेला आहे. या नव्या वर्षातही कोरोनाचा धोका संपलेला नाही. ब्रिटनमधल्या नव्या कोरोना व्हायरसची  जगभरत भीती आहे. अमेरिकेतही अजून परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. भारतासह काही देशांनी आता लसीकरण कार्यक्रमाची   सुरुवात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी शनिवारी सुरुवात केली.

जग कोरोनापासून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमधल्या तियानजिन शहरात आईस्क्रीममध्ये   कोरोना व्हायरस सापडला आहे. ही बातमी समजताच आरोग्य अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी हे आईस्क्रीम खालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या आईस्क्रीमच्या तीन सँपलमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे.

देशभर पार्सलचं वितरण!

‘चायना डेली’ नं दिलेल्या वृत्तानुसार Tianjin Daqiaodao या फूड कंपनीला एकूण 4,836 बॉक्स संक्रमित झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी 2,089 पार्सल कंपनीच्या स्टोरेजमध्ये आहेत. तर 1, 812 बॉक्स अन्य राज्यांमध्ये रवाना झाले आहेत. काळजीची बाब म्हणजे यापैकी 935 बॉक्स स्थानिक बाजारपेठेत दाखल झाले होते.

संक्रमित बॉक्समधील अद्याप फक्त 65 बॉक्सचीच विक्री झाल्याचं उघड झालं आहे. ही बातमी समजताच कंपनीनं 1662 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर त्यांची तपासणी देखील कण्यात येत आहे. या आईस्क्रीम बॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता शोध घेतला जात आहे.

असं का झालं?

कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानचं आईस्क्रीमही संक्रमित झालं असावं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेची योग्य खबरदारी घेतली नसल्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

आईस्क्रीमला थंड हवामानात ठेवण्यात येत असल्यानं त्यामध्ये व्हायरस जीवंत राहण्याची शक्यता जास्त आहे. मात्र यामध्ये घाबरण्याची गरज नाही, असं आवाहानही तज्ज्ञांनी केलं आहे.