कृषी कायद्याच्या विरोधात ५ नोव्हेंबरला चक्का जाम, तर २६ नोव्हेंबरला संसदेला घेराव - राजू शेट्टी

October 28,2020

नवी दिल्ली : २८ ऑक्टोबर - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा विस्तार देशभरात करण्यावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून ५ नोव्हेंबरला देशभरात चक्क जाम आंदोलन केले जाणार आहे. तसेच तसेच २६ आणि २७ नोव्हेंबरला दिल्लीत संसदेला घेराव घालण्याचीही तयारी शेतकरी संघटनांनी केली आहे. 

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची  आज दिल्लीत बैठक झाली. त्यात ३००हुन अधिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी देशव्यापी आंदोलनाचा निर्णय झाला असून समितीच्या सुकाणू समितीचे सदस्य असलेले राजू शेट्टी यांनी हि बाब सांगितली. या आंदोलनासाठी ५ सदस्यीय समिती नेमली असून यात राजू शेट्टी यांच्यासह व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, गुरूनं सिंग, बालविरसिंग यांचा समावेश आहे. राजू शेट्टी म्हणाले. कृषी सुधारणा कायद्यांमध्ये शेतीमाल हमीभावाने खरेदीची अट घालणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकारने कार्पोरेट कल्याणकडे लक्ष दिल्यामुळे हमीभावाच्या बंधनाचा उल्लेख केला नाही. सरकारच्या अस्थिर आयातनिर्यात धोरणामुळे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. हे कायदे तत्काळ मागे घेतले जावे, यासाठी देशभरात ५ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत जक्काजम आंदोलन करून शेतकऱ्यांची एकजूट सरकारला दाखवून देऊ. तसेच त्यानंतर २६ व २७ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये संसदेला घेराव घातला जाईल, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.