लग्नाच्या पहिल्याच रात्री फरार होणारी नवी नवरी अटकेत

October 28,2020

औरंगाबाद : २८ ऑक्टोबर - लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातील सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या नवरीला पोलिसांनी अटक केली आहे. पैठण पोलिसांनी परभणी येथे विशेष तपास पथक पाठवत ही कारवाई केली. त्यामुळे लग्न करून पैसे लुबाडणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संदर्भात पैठण पोलिस ठाण्यात आपली सून हरवल्याची तक्रार सासू सुनंदा वंसारे यांनी दिली होती.

शहरातील लक्ष्मीनगर येथील एका विधवा महिलेच्या मुलाचे आठवठाभरापुर्वी उषा पवार (वंसारे) हिच्याशी लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरी घरातील सोने, चांदी आणि ५0 हजार रुपयांची रक्कम घेवून फरार झाली. यासंदर्भात पैठण पोलिस ठाण्यात उषा पवार बेपत्ता असल्याची तक्रार सासू सुनंदा वंसारे यांनी दाखल केली. घटनेची सविस्तर माहिती मिळवल्यानंतर बनावट लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींना अटक केली. दरम्यान उषा पवार व इतर संशयित आरोपींवर भादंवी कलम ४२0, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पैठण पोलिस करत आहेत.

आरोपी नवरी उषा पवारची बनावट बहिण पूजा पवार व तिचा मेव्हणा राजू पवार हे परभणी येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच आरोपी नवरी परभणी येथे आपल्या पहिल्या नवर्याजवळ राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पैठण पोलिसांचे एक पथक तात्काळ विजया दशमीच्या दिवशी परभणीला रवाना झाले. मुख्य आरोपी उषा पवार आणि फरार नवरी उषा उर्फ मानसी पवार ही पोलिसांच्या हाती लागले. तर इतर संशयित पूजा पवार, तिचा नवरा राजू पवार असे तीन ते चार आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी उषा पवारला अटक करून पैठणला आणले आहे. तिथे तिची चौकशी करण्यात येत आहे. 

लग्न करून फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये विवाहेच्छुक व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दिले जाते. त्यानंतर लग्न करून विविध मार्गाने पैसे उकळले जातात. यांचे जाळे राज्यात तसेच राज्याबाहेर देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात लग्न करून फसवणूक करण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी वर्तवली आहे.