पुरातत्व संशोधक डॉ. श्रीपाद चितळे यांचे निधन

August 01,2020

नागपूर : १ ऑगस्ट - शहरातील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्व संशोधक, लेखक व संस्कार भारतीचे माजी अखिल भारतीय प्राचिन कला विधा संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे आज शनिवारी सकाळी महालमधील काठी रोड येथे निधन झाले. सकाळी ५.३० वाजता ब्रेन हॅमरेजने डॉ. चितळे यांची प्राणज्योत मालवली. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आप्त परिवार आहे.

 श्रीपाद चितळे हे एक व्यासंगी, अभ्यासू व त्यांच्या पुरातत्त्व विषयक संशोधनाला समर्पित असे व्यक्तीमत्त्व होते. विदर्भातील पुरातत्त्वीय अवशेष व प्राचिन स्थळांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. हा अभ्यास त्यांनी आपल्या लेखनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी आपल्या संशोधनावर ३८च्या वर पुस्तकांचे लेखन केले आणि असंख्य असे लेख विविध वृत्तपत्रे, मासिके व अन्य ठिकाणी लिहिले आहेत. हे लेख वैदर्भीय इतिहासाचा मागोवा घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा विद्वव गौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कारांना सन्मानही झाला आहे. सतत भटकंती, इतिहास आणि पुरातत्त्वाविषयी माहिती देणारे व्याख्याने हा त्यांचा कायम छंद राहिला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी नागपुरात ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला. अनेक जण या उपक्रमात सहभागी होऊन ऐतिहासिक वारसांची माहिती घेत होते. लोकप्रियता वाढत गेल्याने हा उपक्रम नंतर विदर्भातही सुरू झाला होता. अगदी कोरोनाचा काळ सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू होता. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी अभ्यासक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.