नागपुरात मृत्यूचे तांडव एकाच दिवशी ७५ मृत्यू , ६१९४ बाधित

April 16,2021

नागपूर : १६ एप्रिल -  नागपूर शहरातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे बहुदा ती अनियंत्रित झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत असतानाच आता रोजच्या होणाऱ्या मृत्यूचा कहर सुरु झाला काल ७४ रुग्णांच्या मृत्यूने शहर हादरले असतानाच आज परत ७५ रुग्णांचा कोरोनाने  मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ६१९४ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. बाधितांची संख्याही आता ३ लाखाचा टप्पा ओलांडून समोर गेली आहे.
नागपूर शहरातील कोरोनाचे दैनंदिन आकडे आपलेच जुने विक्रम मोडीत काढायला निघाले आहेत. शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण असूनही लोक बेफिकिरीने बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे रोजचे वाढणारे आकडेही लोकांना आवरण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनासह सगळेच हतबल झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात तब्बल ६१९४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून बाधितांची संख्या आता ३०९०४३ वर पोहोचली आहे. आज आलेल्या बाधितांपैकी २४०८ ग्रामीण भागातील, ३७७९ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. तर शहरात आज ७५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ३१ रुग्ण ग्रामीण भागातील,३७ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत एकूण मृत्युसंख्या ६१०९ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासात नागपूर शहरात २५५७३ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ११४७८ ग्रामीण भागात तर १४०९५ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. आज ५८९४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा २३८५९९ वर पोहोचला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ७७.६० टक्के इतके झाले आहे. शहरात सध्या ६४३३५ ऍक्टिव्ह  कोरोना रुग्ण असून त्यात २४८१८ ग्रामीण भागातील तर ३९५१७ शहरातील रुग्ण आहेत.