दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण व मृत्यू , ५३३८ बाधित तर ६६ रुग्णांचा मृत्यू

April 07,2021

नागपूर : ७ एप्रिल - राज्याच्या उपराजधानीत दिवसेंदिवस कोरोनाचे अधिक भयानक स्वरूप समोर येत आहे. आज दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा तसेच मृत्युसंख्येचा शहरातील उच्चान्क नोंदविला गेला आहे. गेल्या २४ तासात नागपूर तब्बल ५३३८ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजचे आकडे पाहता कडक निर्बंध लावूनही कोरोनाचा  प्रसार कमी न होता त्यात वाढ झालेली दिसून येत आहे. आजचे आकडे पाहता नागपूर शहराची परिस्थिती फार वाईट असल्याचे लक्षात येत आहे. 

कडक निर्बंध लावूनही काही लोकांच्या निष्काळजी वागणुकीमुळे कोरोनाचा प्रसार अविरत सुरु आहे व हा पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असल्याचे जाणवत  आहे. आज नागपुरात ५३३८ नवी बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यात ३२८३ शहरातील, २०४८ रुग्ण ग्रामीण भागातील  तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यामधील आहेत. रुग्णसंख्येने अडीच लाखाचा टप्पा ओलांडला  असून एकूण रुग्णसंख्या २५४२२१ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातही वाढलेली  रुग्णसंख्या कोरोनाचा प्रसार चांगलाच वाढला असल्याचे दर्शविते. आज तब्बल ६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २५ ग्रामीण भागातील, ३४ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या ५५०४ वर पोहोचली आहे. 

आज शहरात १९१९१ चाचण्या घेण्यात आल्या असून, ८७४३ ग्रामीण भागात तर १०४४८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. शहरात सध्या ४२९३३ ऍक्टिव्ह बाधित रुग्ण असून त्यात १३८८८ ग्रामीण भागातील तर २९०४५ शहरातील रुग्ण आहेत.  आज ३८६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २०५७८४ वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्तीचा दर  ८०.९५ टक्के इतका आहे.