नागपुरात मांज्याने घेतला तिसरा बळी

January 12,2021

नागपूर : १२ जानेवारी - अवघ्या दोन दिवसांवर मकरसंक्रांत आली असतानाच आज इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत   जाटतरोडी परिसरात एका युवकाचा  मांज्याने गळा कापल्यामुळे घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील दहा दिवसातील हा मांज्याचा तिसरा बळी आहे. पहिला वंश तिरपुडे, दुसरा एंटा सोळंकी तर आजचा तिसरा बळी हा  प्रणव ठाकरे  असून तो ज्ञानेश्वर नगर येथील रहिवासी आहे. दुपारच्या वेळेस तो रस्त्यावरून जात असताना अचानक पतंग कटली. दोन मुलं दोन दिशेने मांजा ओढत असताना हा २० वर्षीय युवक तेथून गाडीवरून जात असताना मांजा त्याच्या गळ्यावर आला आणि गळा कापल्या गेल्यामुळे तो रक्ताच्या थारोड्यातच  खाली पडला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

या प्रकरणी  इमामवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.