भावी काळात गुंतवणुकीसाठी भारतच फायदेशीर नितीन गडकरी

December 01,2020

नागपूर, 1 डिसेंबर : संकट सर्वच क्षेत्रांवर असतानाही पायाभूत सुविधांसह देशातील अन्य क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या भारतच फायदेशीर ठरणार आहे. भारतात होणारी गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असणार आहे. असे मत केंद्रीय  महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

होराशियस आशिया मीट या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. कोविडची लढाई सकारात्मकता आणि आत्मविश्‍वासाने जिंकावी लागणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, भारतात ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञान,  कुशल मनुष्यबळ, बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच शासनाचे गुंतवणुकीबाबतचे धोरण योग्य असल्यामुळेच भारतात गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र तर जगात नंबर वन उत्पादन करणारे क्षेत्र ठरणार असून  या क्षेत्राची कामगिरी उत्तम आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारीनिर्मिती या क्षेत्राने केली असल्याचे ते म्हणाले. ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याची संधी कोविडच्या निमित्ताने मिळाली असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, तंत्रज्ञानाच्या साह्याने पेट्रोल- डिझेलवर पर्याय म्हणून जैविक इंधन तयार झाले आहे. आज कृषी, ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. मागास क्षेत्रात उद÷योग नसले तर रोजगार  कसा निर्माण होणार? असा प्रश्‍न उपस्थित करून गडकरी म्हणाले, ग्रामीण व मागास भागातील कच्च्या मालावर आधारित अनेक लहान लहान उद्योग त्या भागात सुरू होऊ शकतात,पण त्यासाठी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था  वाढवावी लागेल. उद्योग व नवीन तंत्रज्ञान तेथे न्यावे लागेल. परिणामी मागास व ग्रामीण भागाचा जीडीपी वाढेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.