बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

October 28,2020

पाटणा : २८ ऑक्टोबर - बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी मतदान होणार असून १०६६ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात चुरस आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी संयुक्त जनला दल ३७ तर भाजपा २९ जागा लढत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाने ४२ ठिकाणी उमेदवार उभे केले असून त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस २० ठिकाणी लढत आहे.

पहिल्या टप्प्यात २.१४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १.१ कोटी महिला आणि ५९९ तृतीयपंथी आहेत. दरम्यान करोना संकटात इतकी मोठी निवडणूक घेणारं बिहार पहिलं राज्य ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये जवळपास ७.२९ कोटी मतदार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बिहारमधील नागरिकांना सुरक्षेची काळजी घेत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंग नियमांची मोदींनी आठवण करुन दिली आहे.