महाराष्ट्रात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नाही याची खंत निश्चित - नितीन राऊत

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - विकास कामांच्या फलकावर नियमानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे असतात. तेव्हा तेथे आमचे छायाचित्र नसते म्हणून खंत नाही, पण काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नाही याची खंत नक्कीच आहे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. राज्य सरकारच्या विकास कामांच्या फलकावर काँग्रेसच्या मंत्र्यांचे छायाचित्रे नसतात. म्हणून काँग्रेसला स्वतंत्रपणे फलक लावावे लागतात. महाविका आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा श्वास गुदमरतोय असे म्हटले जाते, अशी विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले.काँग्रेस नेत्यांची महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी आहे. ते वरिष्ठांना पत्र लिहून व्यक्तही होत आहेत. यासंदर्भात डॉ. राऊत म्हणाले, करोना साथीमुळे शारीरिक अंतर राखणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठलीही समस्या पत्राद्वारे कळवली जाते. त्यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावला जातो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आमच्या व्यथाबाबत पत्रव्यवहार करीत असतात, असेही ते म्हणाले. तीन पक्षाचे सरकार असले तरी काँग्रेस कुठेच पुढे दिसत नाही. काँग्रेस सरकारमध्ये विलगीकरणात गेली आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस विलगीकरणात जाऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष गावागावात, घराघरात आहे. कोणता पक्ष विलगीकरणात जाईल हे लवकरच कळेल, असा टोमणा हाणला.

त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना आपण ब्राम्हणद्वेष्टा नाही. पण जाहीर सभेत बोलताना अनेकांची जिभ घरसत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाला धरून काही लिहले असेल तर ते बोललो. माझे वैयक्तिक मत नाही, असा खुलासाही त्यांनी केला.