आमचे सरकार पाडून दाखवाच - संजय राऊतांचे भाजपला आव्हान

July 13,2020

मुंबई : १३जुलै - मध्यप्रदेशात तीन महिन्यांपूर्वी भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी करत काँग्रेसच्या हातातील सत्ता काढून आपल्या हातात घेतली. त्यानंतर आता राजस्थानातही भाजपकडून सत्ताबदलाच्या हालचाली सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. राजस्थानमध्येही भाजपचे मनसुबे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर महाराष्ट्रातही भाजप अशाच प्रकारे काही डाव खेळू शकते, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

‘हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे; कोणताही मुहूर्त काढा, आमचं सरकार पाच वर्षे चालेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला  दिलेल्या मुलाखतीत हा दावा करत इतर मुद्द्यांवरूनही भाजपला लक्ष केले आहे.

काही लोकांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न डोक्यातून काढून घ्यावे. उद्या अमेरिकेचं सरकारही पाडायला जातील. रोज बोलून दाखवू नका, आमचं आघाडीचं सरकार पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. आज राज्यात कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. आम्ही राज्याला सावरण्याचा प्रयत्न करतोय, मात्र विरोधक बिघडवण्याचा खटाटोप करत आहेत. सत्तेचा अमरपट्टा कोणीही बांधून आलेला नाही. विरोधकांच्या छंदपूर्तीसाठी सरकारकडे अनेक योजना तयार आहेत. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोरोनाच्या संकटसमयी देशातील कोणतेही राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होऊ नये. सर्व राज्ये अस्थिर करणे हा विरोधकांचा अजेंडा आहे.

मात्र हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे. सरकार पाडण्याइतकी भाजपची उडी नाही. भाजपने कुठे सुरुंग लावण्यास सुरुवात केली याची माहिती आम्हाला आधीच मिळेल. समर्थन देणाऱ्या आमदारांना कुठे घेऊन जाणार, चंद्रावर तर घेऊन जाणार नाही? सरकार पडायचे स्वप्न डोक्यातून काढून टाकावे. सध्या राज्याची घडी नीट बसू द्या, त्यानंतर आम्हीच त्यांना सांगू आता सरकार पाडायच्या कामाला लागा. शरद पवार, सोनिया गांधी यांनी सांगितल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर बसले आहेत. त्यांना सत्तेची लालसा नाही. मुळात शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेमुळे भाजप वाढल्याचे म्हटले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत मत असेलही; पण ते चुकीचे आहे असे मला वाटत नाही. ते फार अभ्यासू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना सर्व माहिती आहे- असेही राऊत म्हणाले.