मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलीची आत्महत्या

July 13,2020

नागपूर :१३जुलै - मोठ्या भावाने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला म्हणून नागपुरातील एका 19 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

साक्षी शेंदेकर, असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्याम नगरात घडली आहे. दहा दिवसांपूर्वीसुद्धा नागपूरातच बहिणीने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून तिच्या 13 वर्षीय लहान भावाने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे मोबाईल मिळत नसल्याने लहान मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आल्याचे देखील निदर्शनात आले आहे.

श्याम नगर येथे राहणाऱ्या जांबुवंतराव शेंदेकर यांना एक मुलगा व एक मुलगी आहेत. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांचा मुलगा अक्षय हा खासगी नोकरी करतो तर मुलगी साक्षी महाविद्यालयात शिकत आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने दोन अँड्रॉइड मोबाईल घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे घरात फक्त अक्षयकडेच अँड्रॉइड  मोबाईल होता. पण, महाविद्यालयातील आपल्या मैत्रिणींकडे अँड्रॉइड मोबाईल पाहून साक्षीनेही अँड्रॉइड मोबाईलसाठी हट्ट धरला. पण, अक्षयने मोबाईल घेण्यास नकार दिला. त्यामुळे साक्षीने निराशेत विषारी द्रव प्राशन केले. तीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीला मृत घोषित केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.