काँग्रेसमध्ये नेत्यांची पुढची पिढी सक्रिय

July 13,2020

नागपूर : १३ जुलै - राजकारण आणि घराणेशाही हा कायमच वादाचा विषय राहिला आहे. पण, नेत्यांच्या कर्तबगार मुलांना लोकांनी स्वीकारल्याचेही अनेक दाखले आहेत. नुकतीच युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या मुलांचाही समावेश असून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसी नेत्यांची नवी पिढी राजकारणात उतरली आहे. यात नागपुरातील अनेकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात आमदार विकास ठाकरे यांचे पूत्र केतन व दिवंगत श्रीकांत जिचकार यांचे पूत्र याज्ञवल्क्य जिचकार यांना स्थान देण्यात आले आहे. नागपुरातील नगरसेविका नेहा निकोसे यांनाही सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केतन ठाकरे हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांचे पूत्र आहेत. विकास ठाकरे शहराचे महापौर होते. महापालिकेत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. याज्ञवल्क्य जिचकार यांचे वडील दिवंगत श्रीकांत जिचकार हे काँग्रेसमधील दिग्गज नेते होते. समस्त भारतात त्यांच्या ज्ञानाचा दरारा होता. २00४ मध्ये एका अपघातात त्यांचे निधन झाले. आता त्यांचा राजकारणातील वारसा याज्ञवल्क्य जिचकार पुढे येणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल राऊत प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. नगरसेविका नेहा निकोसे यांनाही राजकीय पार्श्वभूमी असून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. सागर चव्हाण, वसीम शेख, नितीन सरनाईक, रोहित खैरवार, भूषण मरस्कोल्हे, आसिफ शेख, फजलूर कुरेशी, धीरज धकाते, चक्रधर भोयर, नीलेश खोरगडे, पीयूष वाकोडीकर, अफजल शाह, रौनक चौधरी, प्रवीण जामभुले, रंजित बोराडे या नागपुरातील कार्यकर्त्यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.