अमरावतीत बापलेकाची केली हत्या

July 09,2020

अमरावती : ९जुलै - जादूटोणा करण्यात आल्यानेच मुलाने आत्महत्या  केल्याच्या  संशयावरून बाप-लेकाची हत्या करण्यात आली. हि घटना ब्राम्हणवाडा थडी पोलिसठाण्याच्या हद्दीतील सांभोरा येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. 

पोलीस सूत्रानुसार, सहदेव बिसेन गजाम आणि बिसेन भिकाजी गजाम (रा. सांभोरा ) अशी मृतांची नवे आहेत. या प्रकरणी महादेव सोमलाल कुमरे (४५), यादव सोमलाल कुमरे (४०), संजय महादेव कुमरे (२०), अजत महादेव कुमरे (१८), अक्षय मंगलसिंग कुमरे (२०,सर्व रा. सांभोरा) असे खुनाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. आरोपी यादव कुमरे याचा मुलगा विशाल कुमरे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. 

महादेव व त्याचे वडील बिसेन यांनी केलेल्या जादूटोण्यामुळे त्याने हे पाऊल उचलले, असा संशय कुमरे कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला. त्याचा वचपा काढण्याची संधी ते शोधत  होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी कुमरे कुटुंबियातील सदस्य एकत्रित आले आणि त्यांनी लोखंडी पाईप, सळाख व लाकडी काठ्यांनी हल्ला चढवून सहदेव गजाम, बिसेन गजाम यांना बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत, इजा झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी अरुण नंदू कुमरे (रा. सांभोरा ) यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली. मृत बिसेन हे त्याचे आजोबा व सहदेव त्याचे मामा होते. त्याच्या मामेभावालाही आरोपींनी उजव्या पायाला, गुडघ्यावर मारहाण केली. अरुणच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजार करण्यात आले. त्यांना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.