रामटेकमध्ये १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

July 09,2020

नागपूर : ९जुलै - रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन येथील १३ वर्षांच्या मुलाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, प्रिन्स रवींन्द्र खानकुळे (१३) हा वर्ग आठवी, इंदिरा गांधी विद्यालय, नगरधन येथे शिकत होता. प्रिन्सला मोबाईल गेम खेळायचा छंद होता. तो रोज मोबाईल गेम खेळायचा. पण, त्याला वडील मोबाईल गेम खेळण्यावरून रागावत होते. मृतक प्रिन्स हा जिद्दी स्वभावाचा असल्यामुळे वडील मोबाईल खेळू देत नसल्यामुळे बुधवारी (८ जुलै) सकाळी ९ वाजताच्या सुमारास आई-वडील शेतात गेले असताना त्याने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

याबाबत पोलिस ठाण्याला माहिती मिळताच रामटेक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. सदर गुन्हाच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद सीआरपीसी कलम १७४ अन्वये करण्यात आली असून पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहेत.