दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रातिकात्मक मूर्तीची काश्मिरात प्रतिष्ठापना

July 09,2020

श्रीनगर : ९जुलै - काश्मीरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी सातत्याने येणार्या भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी गुरेज सेक्टर कंजलवान या गावामध्ये साकारलेल्या गणेश मंदिरात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती फक्त महाराष्ट्रापुरती र्मयादित नाही. फक्त देशातून नाही तर जगभरातून लोक फक्त दगडूशेठ गपणतीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात येत असतात.

६ मराठा बटालियनचे प्रमुख कर्नल विनोद पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना पत्र लिहून जम्मू काश्मीरात दगडूशेठच्या गणरायाची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली. युवा शिल्पकार विपुल खटावकर याने दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती साकाली. ही गणेशमूर्ती ट्रस्टने रेल्वेने काश्मीरला पाठवण्याची व्यवस्था केली होती.

मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी उत्साहाने योगदान दिले. कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळजवळ चार ते पाच फूट इतका बर्फ होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ १२ फुटांपयर्ंत वाढत गेला. परंतु, जवानांनी मंदिराच्या कामासाठी र्शमदान आणि अर्थसहाय्य केले. चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करून साकारलेले हे मंदिर भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे, असं कर्नल विनोद पाटील यांनी सांगितले आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गणरायाच्या आशीर्वादाने जवानांच्या शौर्याला झळाळी प्राप्त होईल. गेल्या दशकापासून ६ मराठा बटालियन आणि ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून मूर्ती भेट म्हणून पाठविण्याचे ट्रस्टने ठरविले.