अभिनेते जगदीप यांचे निधन

July 09,2020

मुंबई : ९जुलै - बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते जगदीप यांचे वृद्धापकाळाने मुंबईत बुधवारी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही काळापासून त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यातच काल बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांचा दफनविधी होणार आहे. जगदीप यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टी एका निखळ मनोरंजन देणाऱ्या दमदार अभिनेत्याला मुकली आहे. 

जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता. त्यांची शोले या चित्रपटातील 'सुरमाँ भोपाली' साकारलेली ही भूमिका फार गाजली होती. या भूमिकेमुळे त्यांना मोठे ग्लॅमर मिळाले होते. जगदीप यांचे मूळ नाव सय्यद इश्तियाक जाफरी असे होते. जगदीप यांच्या पश्चात मुलगा जावेद जाफरी, निर्माता व दिग्दर्शक नावेद, मुलगी मुस्कान जाफरी व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. जगदीप यांनी प्रदीर्घ काळ सिनेसृष्टीची सेवा केली. तब्बल ४०० चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या निधनाने एका दिग्गज विनोदी कलावंताला बॉलीवूड मुकल्याची भावना विविध कलावंतांनी व्यक्त केली आहे.

 जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी दतिया सेंट्रल प्रांतात झाला. चंदेरी दुनियेत त्यांनी बालकलाकार म्हणून पहिले पाऊल ठेवले. बी. आर. चोप्रा यांच्या अफ्साना चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यानंतर ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुराना मंदिर, थ्री डी सामरी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. जगदीप यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिले. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटात जगदीप यांनी सूरमा भोपाली हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर १९९४ मध्ये अंदाज अपना अपना या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.