भाजप राज्यसभेतील संख्याबळात भर टाकण्याच्या प्रयत्नात

June 04,2020

नवी दिल्ली, 4 जून - देशावर कोरोना, चक्रीवादळाचे संकट कोसळलेले असतानाच राज्यसभेच्या 24 जागांसाठी 11 जूनला होणार्‍या निवडणुकांचे पडगमही वाजू लागले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक या चार राज्यांत  पूर्वीपेक्षा राज्यसभेच्या चार जास्त जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असून त्या दृष्टीने पक्षाकडून डावपेच आखले जात आहेत.

भाजपने गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. हीच खेळी भाजप कर्नाटकमध्येही केली आहे. कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांच्या निवडणुकांसाठी कालपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटक विधानसभेतील भाजपची ताकद बघता हा पक्ष राज्यसभेच्या दोन जागा सहज जिंकू शकेल. मात्र त्यावरह समाधान न मानता आणखी एका जागेवर विजय मिळविण्याचे लक्ष्य भाजपने राखले आहे. जनता दल व काँग्रेस आघाडीमध्ये झालेल्या मतभेदांचा फायदा उठवत कर्नाटकमध्ये भाजपने डावपेचांद्वारे सत्ता हस्त केली होती.

मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे व त्यांचे समर्थक असलेल्या 22 आमदारांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर हे सर्वजण भाजपच्या चळवणीला गेले. त्यामुळे या राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आले. मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या जागांसाठी होणार्‍या निवडणुकांत भाजपतर्फे ज्योतिरादित्य शिंदे व सुमेर सिंह हे रिंगणात आहेत. तर काँग्रेसने दिग्विजयसिंह व फुलसिंग बरैया यांना उमेदवारी दिली आहे. मध्यप्रदेशातील आपल्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता भाजप राज्यसभेच्या दोन्ही जागांवर सहजी विजय मिळवेल अशी चर्चा आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणार्‍या निवडणुकांत भाजपर्फे रामिलाबेन बारा व अभय भारद्वाज तर काँग्रेसतर्फे शक्तिसिंह गोहिल व भरतसिंह  सोळंकी हे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र भाजपने गुजरातमध्ये नरहरी अमीन हे तिसरे उमेदवारही उभे केले आहे. गुजरातमध्ये विधानसभेत भाजपचे 103 आमदार असून काँग्रेसचे 68, भारतीय ट्रायबल पार्टीचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, एक अपक्ष आमदार असे संख्याबळ आहे. राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला 34.01 टक्के मते मिळविण्याची आवश्यकता आहे. मात्र बीटीपी, राष्ट्रवादी काँग्र्रेस,अपक्ष नेमके कोणाला मतदान करतील याबद्दल अंदाज लावणे कठीण आहे.