महाराष्ट्रात सर्वात जास्त श्रमिक स्पेशल रद्द

June 04,2020

नवी दिल्ली, 4 जून - श्रमिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांच्या आतापर्यंत 256 फेर्‍या रद्द झाल्या असून, यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गाड्या रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. आधीच राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री  यांच्यात श्रमिक गाड्या सोडण्यावरून वाक् युद्ध जुंपलेले असताना या नव्या आकडेवारीमुळे वादात भर पडण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यांमध्ये अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गृहराज्यात पाठवण्यासाठी  रेल्वेने 1 मे पासून विशेष श्रमिक रेल्वे सुरू केल्या. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4197 श्रमिक रेल्वे चालवल्या आहेत. त्यापैकी 4116 गाड्यांचा प्रवास पूर्ण झाला असून 81 गाड्या मार्गावर आहेत.

1 मे ते 31 मे या कालावधीत रेल्वेने एकूण 4040 श्रमिक गाड्यशा चालवल्या. त्यापैकी 256 गाड्या राज्यांमुळे रद्द कराव्या लागल्या. यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गाड्यशा रद्द केल्याचे रेल्वेची आकडेवारी सांगते. महाराष्ट्रातून सुटणार्‍या 105 श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या, तर गुजरातमधून 47, कर्नाटकातून 38 आणि उत्तरप्रदेशातून 30 गाड्या रद्द झाल्या. दोन राज्यांमधील समन्वयाअभावी या गाड्या रद्द कराव्या लागल्याचे रेल्वे अधिकार्‍याने सांगितले.