नागपूरात बरसला रोहिणीचा पाऊस

June 04,2020

नागपूर 4 जून - नागपूरसह विदर्भात सर्वत्र मृगपर्व रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला. यंदा तसा पावसाळा थांबलाच नाही. असेच वातावरण होते. एप्रिलच्या माध्यापासून उन्ह तापायला लागली. अकोला, नागपूर सारख्या ठिकाणी पारा 47 च्या  वर गेला होता. मात्र आता जूनच्या सुरुवातीपासूनच रोहिणी (मान्सूनपूर्व पाऊस) बरसायला सुरुवात झाली. 3 जून रोजी सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. हा पाऊस वादळी मात्र नव्हता.

नागपूर शहरासह जिल्ह्यातही 2 जूनच्या रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात वातावरण ढगाळलेले होते. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी ठोकाचा पाऊस झाला. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात  काही ठिकाणी रात्रीपासूनच पाऊस सुरू झाला होता. गडचिरोेली, भंडारा, गोंदिया या झाडीपट्टी भागातही पावसाने हजेरी लावली. वर्धेत पहाटे तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पावसाने ताल  धरला होता. समुद्रपूर तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्यात वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान केले होते.

वर्‍हाड म्हणवत्या जाणार्‍या अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यात दिवसभरात पावसाचे दोन तीन शिरवे येऊन गेले. वाशीम जिल्ह्यात मंगरुळनाथ आणि वाशीम तालुक्यात दमदार म्हणावा असा पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात दोन तीन दिवसापूर्वी आषाढात कोसळावा तसा दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर आजही दिवसभर दोन वेळा पावसाळाच सुरू झाला, असे वाटावे असाच पाऊस झाला. अमरावती शहरात दिवसभरात पावसाचे दोन वेळा दमदार ठोक कोसळले. जिल्ह्यात धारणी तिवसा तालुक्यात दमदार पाऊस झाला. इतर ठिकाणी तुरळक पाऊस होताच. आताच पावसाळा सुरू झाल्यागत पाऊस कोसळ्याने मात्र शेतकर्‍यांची चिंता  वाढली आहे. रोहिणी दमदार बरसल्या की मृगाचा पाऊस उशीराने येतो. असा अनुभव आहे. त्यामुळे आता मान्सून लांबेल की काय, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.