नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या 625

June 04,2020

नागपूर, 4 जून - लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर केेंद्र शासनाने अनलॉक घोषित केले. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबधिंत क्षेत्रात जुनेच नियम कायम ठेवून लॉकडाऊनमध्ये शिथिलता  दिली. त्यामुळे शहरातील रस्ते, बाजारपेठामध्ये गर्दी दिसून आली. काल 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यात शहरातील 22 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 601 वर पोहोचली होती. मात्र रात्री या  रुग्णांमध्ये अजून 12 रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 613 वर गेली होती. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यूसंख्या 12 वर पोहोचली होती. आज सकाळीच आणखी नवीन 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्यामुळे आता रुग्णसंख्या 625  इतकी झाली आहे. दरम्यान 409 रुग्णांना प्रकृती सुधारल्यामुळे डिस्चार्ज झाला असून 216 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

भौतिक दूरत्व पाळले तरच कोरोनापासून बचाव होणार आहे. मात्र याचे जराही भान न ठेवता मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर ग्राहकांनी पावसाळापूर्व खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. भौतिक दूरत्व पाळण्याचे मोठे आव्हान यापुढे असणार आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यातील केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण शिकवणी, शॉपिंग मॉल बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त मुंढे यांनी जारी केले. परंतु पहिल्या टप्प्यात शिथिलता दिल्याने कोरोनाची भीती न बाळगता पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी, नागरिकांनी गर्दी केली. मंगळवारी धंतोली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या वृद्धाचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचार्‍यांचे नमुने तपासण्यात आले. यात एक परिचारिका पॉझिटिव्ह आली. ही परिचारिका नागपूरच्या बजाजनगर येथील रहिवासी आहे.