लॉकडाऊन आणि मी - शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातूनच घडेल शैक्षणिक क्रांती राहूल राय

June 01,2020

लॉकडाऊन आणि मी

अचानक आलेली कोरोनाची साथ आणि त्यामुळे जगभरात झालेला लॉकडाऊन बघता आता जागतिक मंदी येणार हे निश्‍चित आहे. मात्र भारतापुरते बोलायचे झाल्यास भारतीय नागरिकांनी या संकटाकडे घाबरून न जाता सकारात्मक  दृष्टीने बघावे. आज कोरोनामुळे समाजात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता वाढताना दिसते आहे. मात्र अशी नकारात्मकता येणे चुकीचे आहे. प्रत्येक कुटुंबात कधीतरी दोन तीन वर्षे अडचणीचे येतातच त्यावेळी सर्व कुटुंबे एकत्र येऊन त्या  अडचणींचा सामना करते आणि पुढे जाते. आपला देश हे देखील एक कुटुंबच आहे. या जागतिक मंदीच्या दरम्यान आपणही सर्वांनी सकारात्मक राहून वाटचाल केली तर आपला देश कोरोनानंतरच्या जागतिक मंदीच्या संकटातून निश्‍चित  बाहेर पडेल असा विश्‍वास नागपूरातील शिक्षणतज्ज्ञ आणि कॅलिबर नोव्हा कॉमर्स अ‍ॅकॅडमीचे संचालक राहूल राय यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर इन्फोच्या लॉकडाऊन आणि मी या स्तंभात आज राहूल राय यांचेशी संवाद साधला गेला. नागपूर इन्फोचे सल्लागार संपादक अविनाश पाठक यांनी त्यांना बोलते केले.

महाराष्ट्रात लॉकडाऊनची सुरुवात 16 मार्चपासूनच झाली होती. ही सुरूवात होताच मी या निर्णयाचे स्वागत करत माझ्या अ‍ॅकॅडमीतील सर्व वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. खरेतर त्यावेळी परीक्षा सुरु होत्या. मात्र परीक्षा आटोपत्या घेत  विद्यार्थ्यांना सुटी दिली आणि घरूनच अभ्यास करण्याचे मार्गदर्शन केले. क्लासला सुटी दिल्यावर माझ्याकडे वेळच वेळ होता. पहिले 10 दिवस तर मी अगदी आरामात घालवले. नंतर मात्र मी माझे राहिलेले वाचन करायला सुरुवात केली. दररोज 3-4 तास विविध विषयांवरील माझे वाचन आजही सुरुच आहे. याशिवाय माझ्या डोक्यातील काही शैक्षणिक प्रकल्पांना मूर्तस्वरुप कसे देता येईल याचे नियोजन मी सुरू केले. या कामावर मी दिवसाकाठी 2-3 तास वेळ देत होतो. यामुळे दिवसातील जवळजवळ 6-7 तास वेळ माझ्या व्यक्तिमत्व विकासातच जात होता.

या काळात मी कुटुंबासोबतही वेळ घालवायला सुरुवात केली. मला 6 वर्षाचा मुलगा आहे. मात्र त्याच्या जन्मापासून मी त्याला पुरेसा वेळ देऊच शकलो नव्हतो. या दोन महिन्यात मला त्याला भरपूर वेळ देता आला. त्याच्या गत 6 वर्षातल्या अनेक आठवणी त्याने माझ्याशी शेअर केल्या. परिणामी आम्ही दोघेही खूप जवळ आलो.

लॉकडाऊन सुरु होण्याआधी माझा मुलगा मोबाईलसाठी अक्षरशः वेडा होता. मात्र गत दोन महिन्यात मी आणि माझी पत्नी त्याच्यासोबत वेळ घालवू लागल्यामुळे तो आमच्या गप्पांमध्ये रमला. परिणामी आज घरात तीन मोबाईल हँडसेट  असून तो एकालाही हात लावत नाही. आमच्यासाठी कोरोनामुळे आलेले लॉकडाऊन ही एक इष्टपत्ती ठरली आहे हे निश्‍चित.

माझ्या पत्नीने औषधीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ती यूट्यूबवर या विषयाचे प्रशिक्षण देते. आ्रमच्या लग्नानंतर आपापल्या व्यापात गुंतून राहिल्यामुळे आम्हालाही एकमेकांसाठी वेळ देता आला नव्हता. या दोन महिन्यात आम्ही भरपूर गप्पा मारल्या आणि आपले पुढील आयुष्य कसे जगावे आणि मुलाचाही भविष्यात कसा विकास करावा या विषयावर आम्ही चांगले नियोजन करू शकलो. याच काळात आम्ही आमच्या मुलाला हिंदी, संस्कृत आणि मराठी या भाषाही शिकवल्या. लॉकडाऊनचा आमच्यासाठी हा देखील फायदाच होता.

या काळात मी माझ्या अ‍ॅकॅडमीच्या विद्यमान विद्यार्थ्यांना फोनवरून शंका विचारायला मुभा दिली होती. त्यांचे फोन यायचेही. त्यातून एक कल्पना सुचली. मी विद्यमान विद्यार्थ्यांसह अ‍ॅकॅडमीच्या माजी विद्यार्थ्यांशीही संपर्क साधून या सर्व विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर जवळजवळ 50 गृप तयार केले. या गृपवरून मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनिटाच्या प्रबोधनात्मक ऑडियो क्लिप्स टाकायला सुरुवात केली. ही कल्पना विद्यार्थ्यांना तर आवडलीच. पण त्यांच्या पालकांनाही ही कल्पना भावली. जे माजी विद्यार्थी संपर्कात नव्हते त्यांनाही कुठून तरी कळले आणि तेही संपर्कात आले. त्यांनाही ऑडिओ क्लिप पाठवू लागलो. आता समजा काही कारणाने ऑडिओ किल्प पोस्ट करायला थोडा उशीर झाला  तर लगेचच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन यायला सुरुवात होते. या निमित्ताने सर्व जुन्या विद्यार्थ्यांशी माझा नव्याने संपर्क झाला आहे.

कोरोनामुळे आता मानवी जीवनातील सर्वच गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे. त्यातून शिक्षणक्षेत्रही सुटलेले नाही. शिक्षण क्षेत्राचे आज तीन प्रमुख घटक आहे. त्यात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा समावेश होतो. या तीनही घटकांनी परस्परांशी समन्वय साधून वाटचाल केली तर शिक्षण क्षेत्र क्रांती घडवू शकेल हा माझा विश्‍वास आहे. यात शाळा महाविद्यालय आणि कोचिन क्लासेस यांचाही महत्त्वाचा सहभाग राहू शकतो.

कोरोनामुळे आलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता आता ऑनलाईन शिक्षण ही गरज होणार आहे. अशावेळी आम्हाला ऑनलाईन शिक्षण हे टाळता येणार नाही. ऑनलाईन शिक्षणाची म्हणजेच ऑनलाईन शिकवण्याची आणि  शिकण्याची आम्हाला तयारी ठेवावी लागेल आणि सवय करून घ्यावी लागेल. कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना थोडा त्रास होतो तसाच त्रास इथेही होईल मात्र एकदा आपण ते स्वीकारले की अडचण येणार नाही. त्यामुळे आपण सर्वानीच  आता ऑनलाईन शिक्षणाकडे वळणे गरजेचे झाले आहे. कोरोनाने आज अनेक समस्या निर्माण केल्या हे खरे. मात्र त्यातून मार्ग काढत आम्हाला पुढे जायचे आहे. आम्ही भारतीय कोणत्याही संकटाशी सामना करत पुढे जातो तसेच यावेळीही  आम्ही पुढे जाऊन या संकटावर मात करू असा विश्‍वास व्यक्त करीत राहूल राय यांनी हा संवाद आटोपता घेतला.

अविनाश पाठक