संपत्तीच्या वादातून थोरल्याने केली धाकट्या भावाची हत्या

August 11,2020

नागपूर: ११ ऑगस्ट - संपत्तीच्या वादातून मेहुण्यांच्या मदतीने लहान भावाने मोठ्या भावाची घरात घुसून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना सोमवारी रात्री जय हिंदनगर येथे घडली. मानकापूर पोलीस व गुन्हेशाखा पोलिसांनी मारेकरी भाऊ व त्याच्या तीन मेहुण्यांना मोर्शी येथून अटक केली. अमीन अली सय्यद अली (वय ४१) असे मृताचे नाव आहे. अमीन याचा लहान भाऊ आसिफ अली सय्यद अली (वय ३८, रा. जयहिंदनगर), जावेद खान हबीब खान (वय ३४) , तमिज खान हफिज खान, सादिक खान हबीब खान (वय २६, तिन्ही रा. मोर्शी, अमरावती) अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. 

अमीन व आसिफ हे भाऊ असून, ते कुटुंबासह जय हिंदनगर येथे राहतात. घरासमोरील भागात दोन गाळे असून, त्यावर अमीन याचा ताबा आहे. याचे भाडेही अमीनच घेतो. या गाळ्यांपैकी एक गाळा देण्याची मागणी आसिफ करायचा. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. काही दिवसांपूर्वी आसिफ हा मोर्शी येथे गेला. त्याने मेहुण्यांना भावासोबत होत असलेल्या वादाबाबत सांगितले. तिघांनी आसिफच्या मदतीने अमीन याच्या हत्येचा कट आखला. सोमवारी कारने चौघे नागपुरात आले. ते अमीन याच्या पाळतीवर होते. 

सोमवारी रात्री अमीन हा घराबाहेर येताच चौघांनी त्याच्यावर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला केला. जीव मुठीत घेऊन अमीन घराच्या आत गेला. अमीन याची पत्नी, मुलगी व मुलाने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र कोणीही मदतीला धावले नाही. मारेकऱ्यांनी अमीन याच्यावर चाकूने सपासप वार केले. अमीनचा मृत्यू होताच चौघेही कारने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर व गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला. मारेकरी मोर्शीला पळाल्याची माहिती मिळताच, मानकापूर व गुन्हेशाखा पोलिसांचे पथक मोर्शी येथे गेले. चौघांना अटक करून नागपुरात आणले.