65 वर्षावरील कलावंतांना शूटिंगला जायला रोखू नका : उच्च न्यायालय

August 08,2020

मुंबई, 8 ऑगस्ट : 65 वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या कलाकारांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. ज्येष्ठ नागरिकांंना दुकान उघडून त्यांचे देैनंदिन व्यवहार करण्याची परवानगी दिली जात असेल तर 65 वर्षावरील कलाकारांना शूटिंगला जाण्यापासून रोखणे योग्य नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने कलाकारांना बंदी घालण्याचा निर्णय रद्द केला.

या कालाकारांनी नियमांचे पालन केले पाहिजे असेही न्यायालयाने स्पष्ट केले. टीव्ही कलाकारांना चित्रीकरणासाठी राज्य सरकारने 30 मे रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार 65 वर्षांवरील कलाकारांना चित्रपट अथवा सीरीयलच्या सेटरवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेत 70 वर्षीय प्रमोद पांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी झाली. मागील सुनावणीच्याचेही न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ नागरिकांना दुकान उघडून त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. तर कोणत्या आधारावर 65 वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या कलाकारांना काम करण्यापासून रोखण्यात येते असा संतप्त सवालही उपस्थित केला होता. तसेच या प्रकरणी श्रण जग्तीयानी यांची अमायकस क्यूरी म्हणून नियुक्ती केली आहे.

राज्य सराकरने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सर्वच ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक गोष्टीखेरीज बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे भेदभाव करणारी नाहीत. ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्याच नियमावलीनुसार जारी करण्यात आली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्येष्ठ कलाकारांना कामावर जाण्यापासून मज्जाव करण्यात आला असल्याचा दावा केला होता. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने हा दावा फेटाळून लावला.