किसान रेल्वे गाडी सुरु झाली

August 08,2020

मुंबई, 8 ऑगस्ट : भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि केेंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यांसारख्या सामानाची ने-आण करण्यात येणार आहे. याचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून सकाळी 11 वाजता ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापूर स्थानकापर्यंत जाणार आहे. किसान रेल्वे गाडीत रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आले आहेत. 17 टनपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. याच डिजायनही हटके आहे. कपूरथला येथील रेल्वे कारखान्यातून या रेल्वेच्या बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यामधील कंटेनर फ्रीजसारखे असतील. ही रेल्वे म्हणजेच चालते फिरते कोल्ड स्टोरकेज असणार आहे. या रेल्वेगाडीत शेतकर्‍यांच्या पालेभाज्या, फळे, मासे, मांस आणि दुधासारख्या पदार्थांना ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बिहार या मार्गावर किसान रेल्वेगाडी आठवड्यातून एकदा धावेल. महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली स्थानकातून ही गाडी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी पटनाजवळील दानापूर स्थानकात पोहचले या रेल्वेगाडीला महाराष्ट्रातून बिहारमध्ये पोहचण्यासाठी 32 तासांचा कालावधी लागणार आहे.