रिया चक्रवर्तीची ईडीने केली सात तास चौकशी

August 08,2020

मुंबई, 8 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुशांतची लिव्ह इन पार्टनर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने तब्बल सात तास कसून चौकशी केली. मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये ईडीने रियाचा जबाब नोंदवून घेतला.

रियावर सुशांतला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात ईडीने आर्थिक गैरव्यवहारासंबंधी पीएमएलए अन्वये गुन्हा नोंदविला आहे. त्याच संदर्भात रियाचा ईडीने जबाब नोंदवून घेतली आहे. रिया सकाळी साडे अकरा वाजता बेलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाली. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविकही होता. शौविक हा देखील या प्रकरणात एक संशयित आरोप आहे. रियाची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिलादेखील ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले होते. रिया ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने श्रुती तिथऐ दाखल झाली.

सुशांतचा मित्र आणि रुमसेट सिद्धार्थ पिठानी यालादेखील ईडीने जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावले होते. सिद्धार्थ हा गेले वर्षभर सुशांतसोबत राहात होता. 14 जून रोजी ज्या दिवशी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्या दिवशी आपण त्याच फ्लॅटमध्ये होतो, असे सिद्धार्थने काही वृत्त वाहिन्यांना सांगितले आहे. त्यामुळे सिद्धार्थचा जबाब महत्त्वाचा आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदविला असून, सिद्धार्थचा जबाब नोंदवून घेतला आहे.