चीनसोबत काँग्रेसने केलेल्या कराराबाबत राहूल आणि सोनियांनी देशाला स्पष्टीकरण द्यावेे : भाजपाचे आव्हान

August 08,2020

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसच्या झालेल्या सामंजस्य कराराबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी देशवासीयांसमोर स्पष्टीकरण द्यावे असे थेट आव्हान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा  यांनी दिले.

काँग्रेस आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षात 2008 मध्ये एक सामंजस्य करार झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आल्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे  यांनी एका राजकीय पक्षाचा चीनमधील कम्युनिस्ट पक्षासोबत कराराचं कसा होऊ शकतो. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत, असे याआधी कायद्यात कधी ऐकले नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश न्या. बोबडे यांनी दिल्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका परत घ्ेतली.

या मुद्यावरून सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवताना नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षात झालेल्या सामंजस्य करारामुळे सर्वोच्च न्यायालयही हैराण झाले आहे. या करारावर सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या स्वाक्षर्‍या असल्यामुळे त्यांनी देशवासीयांसमोर स्पष्टीकरण दिले पाहिजे. राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणग्यांच्या बदल्यात भारतीय बाजारपेठ चीनसाठी खुली करण्यात आली का? यामुळे भारतीय बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. आपल्या ट्विटसोबत नड्डा यांनी एका दैनिकातील मथळ्याचा स्क्रीन शॉट प्रसारीत केला.

लडाखसीमेवरील चीनसोबतच्या संघर्षाच्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने हल्ला चढवत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून नड्डा यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसने केलेल्या कराराचा मुद्या उपस्थित केला आहे.