महाराजबागेतील 'जान' ला लवकरच मिळणार जोडीदार

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘जान’ या वाघिणीला लवकरच एक जोडीदार मिळणार आहे.  चार वर्षांपूर्वी या वाघिणीचा जोडीदार ‘साहेबराव’ या वाघाला गोरेवाडा बचाव केंद्राने नेले होते. तब्बल चार वर्षांनंतर गोरेवाडा प्रशासनाकडून या वाघिणीसाठी ‘एनटी-१’ हा वाघ जोडीदार म्हणून पाठवण्यात येत आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ‘जान’ या वाघिणीसाठी जोडीदार शोधा याच अटीवर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या कृती आराखडय़ाला परवानगी दिली होती. त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सातत्याने राज्याच्या वनखात्याकडे वाघाची मागणी केली. गोरेवाडा बचाव केंद्र होण्यापूर्वी याच प्राणिसंग्रहालयाने वनखात्याच्या वाघांना आश्रय दिला होता. मात्र, हे केंद्र होताच २५ जुलै २०१६ ला ‘साहेबराव’ हा वाघ तर १६ जुलै २०१७ ला ‘ली’ ही वाघीण नेली होती. त्यानंतर मानव-वन्यजीव संघर्षांतील अनेक वाघ गोरेवाडा बचाव केंद्रात आले आणि या केंद्रात वाघांसाठी असलेले दहाही पिंजरे ‘फुल्ल’ झाले. दरम्यान, मानवी जीवितास धोकादायक ठरलेला ‘एनटी-१’ हा वाघ जेरबंद करून गोरेवाडय़ात आणला गेला. त्यावेळी पुन्हा एकदा महाराजबाग प्रशासनाने वनखात्याकडे या वाघाची मागणी केली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी हा वाघ महाराजबाग प्राणिसंग्रहालयात पाठवण्याची परवानगी दिली. मात्र, या वाघाला निसर्गमुक्त करायचे की कायम पिंजराबंद ठेवायचे याबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वेगळ्याने निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालयाच्या परवानगीशिवाय हा वाघ लोकांना पाहण्यासाठी ठेवू नये, असेही या परवानगी पत्रात नमूद के ले आहे. त्यामुळे एकीकडे ‘जान’या वाघिणीसाठी जोडीदार मिळाल्याचा आनंद असला तरीही समितीच्या निर्णयापर्यंत प्राणिसंग्रहालय प्रशासनाला तो साजरा करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.