वर्धेजवळ ट्रक चालकांना लुटणारा आरोपी अटकेत

August 05,2020

वर्धा : ५ ऑगस्ट - वर्धा नागपूर मार्गावर ट्रकची मोठी वाहतूक आहे. रात्रीच्यावेळी ट्रकचालक रस्त्यालगतच्या धाब्यावर विश्रांतीसाठी थांबतात. अशा ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल हिसकल्या जात होते. तसेच ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातून रोख रक्कम व मोबाईल जबरीने घेण्याच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या.

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला. त्यानुसार वर्धा बस स्थानकाजवळील मैदानातील झोपड्यांमध्ये सुगावा लागला. या ठिकाणी छापा टाकल्यावर शाहरूख उर्फ शेख रफी या आरोपीस अटक करण्यात आली. तो हैद्राबादचा राहणारा असून त्याने संजू शिंदे व राजू पवार या स्थानिकांच्या सहाय्याने मोबाईलसोबतच मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.

याचबरोबर वर्धा शहर, सावंगी, सेलू, बुटीबोरी व अन्य ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपीकडून ११ मोबाईल, चाकू, कैची तसेच सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे तसेच महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, सलिम कुरेशी, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे यांच्या चमूने सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई केली.